Add parallel Print Page Options

तर मग यहूदी असण्यात फायदा काय? किंवा सुंतेपासून फायदा काय? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. कारण सर्वप्रथम त्यांना देवाची वचने विश्वासाने सोपविण्यात आली होती. हे खरे आहे की त्यातील काही अविश्वासू होते; देवाच्या विश्वासूपणाला अविश्वासूपणा नाहीसा करील काय? खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,

“तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत
    असता तू विजय मिळविशील.” (A)

जर आपल्या दुष्टपणामुळे देवाचा न्याय स्पष्ट होत असेल तर त्याला काय म्हणावे? देव जो आपणावर क्रोध आणतो त्याला अनीतिमान म्हणावे काय? (मी हे मानवाप्रमाणे बोलतो). खात्रीने नाही! कारण मग देव जगाचा न्याय कसा करील?

परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?” आपण का वाईट करु नये जर त्याचा परिणाम चांगला होत असेल. कारण काही जण आपल्या विरुध्द वाईट बोलत आहेत, आणि त्यांना मिळणारी शिक्षा त्याबद्दलचा न्याय आहे.

सर्व लोक दोषी आहेत

तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत. 10 शास्त्रात असे लिहिले आहे:

“पापाशिवाय असा कोणीही नाही.
    एकही नाही.
11 समंजस असा कोणी नाही.
    कोणीही देवाचा शोध करीत नाही.
12 ते सर्व दूर गेले आहेत,
    आणि सर्व लोक निरुपयोगी झाले आहेत.
चांगले करणारा कोणी नाही,
    एकही नाही.” (B)

13 “लोकांची तोंडे उघड्या कबरांसारखी आहेत
    ते आपल्या जिभांनी लोकांना फसवितात.” (C)

“ते ज्या गोष्टी बोलतात त्यात सापाचे विष असते.” (D)

14 “त्यांची तोंडे शापांनी आणि कडूपणाने भरली आहेत.” (E)

15 “त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.
16     जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात.
17 त्यांना शांतीचा मार्ग माहीत नाही.” (F)

18 “त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.” (G)

19 आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्रा प्रमाणे सर्व दोषी आहेत. 20 नियमशास्त्राच्या कर्मांनी कोणीही देवासमोर नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते.

देव लोकांना नीतिमान कसे करतो?

21 परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्वाची कृती नियमशास्त्राव्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. 22 देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही. 23 सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. 24 परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे. 25-26 लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमान आहे हे सिद्ध व्हावे.देवाच्या सहनशीलतेमुळे त्याने हे सिद्ध केले की, या सध्याच्या काळी तो नीतिमान आहे. यासाठी जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो नीतिमान असावा.

27 मग आमच्या बढाई मारण्याचे प्रयोजन काय? ती वगळण्यात आली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर ज्यामध्ये विश्वास आहे, त्याच्या आधारे. 28 कारण आपण असे मानतो की, मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्माशिवाय नीतिमान ठरतो. 29 किंवा देव फक्त यहूद्यांचाच आहे काय? तो विदेशी लोकांचा नाही काय? होय, तो विदेशी लोकांचादेखील आहे. 30 ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी तो ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरवील. 31 तर मग आपण या विश्वासाचा आग्रह धरुन नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? खात्रीने नाही, आपण तर नियमशास्त्राला मान्यता देतो.