Add parallel Print Page Options

प्रमुक गायकासाठी दावीदाचे मास्कील (बोधपर स्तोत्र) “दावीद अहीमलेखाच्या घरी आला आहे” असे देवगअदोमीने शौलाकडे येऊन सांगितले त्यावेळचे स्तोत्र

52 बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस?
    तू देवाला एक कलंक आहेस.
    तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस.
तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे.
    तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस.
तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस.
    तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते.

तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते.
म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल.
    तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल.
    तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.

चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन.
    ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील.
ते तुला हसतील.
    व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि
    त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.”

पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे.
    मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो.
देवा, तू केलेल्या गोष्टींबद्दल मी सर्वकाळ तुझी स्तुती करतो.
    तुझ्या इतर भक्तांप्रमाणे मी ही तुझ्या नावावर विश्वास ठेवतो.