Add parallel Print Page Options

15 मग परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, रानातील झाडांच्या लहान लहान फांद्यांपेक्षा द्राक्षवेलींचे तुकडे चांगले का? नाही. द्राक्षवेलीच्या लाकडाचा कशासाठी उपयोग होतो का? नाही. ताटल्या अडकवून ठेवण्यासाठी त्याच्यापासून खुंट्या बनविता येतात का? नाही. लोक त्या लाकडाला फक्त आगीत टाकतात, काही काटक्या टोकाकडून जळू लागतात, मध्यावर काळ्या पडतात, पण त्या काही पूर्णपणे जळत नाहीत. त्या जळक्या काटक्यांचा काही उपयोग आहे का? ते लाकूड जळण्यापूर्वी जर तुम्ही त्या लाकडाचा उपयोग करु शकत नसाल, तर ते लाकूड जळल्यावर नक्कीच त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजेच द्राक्षवेलींच्या काटक्या ह्या रानातल्या झाडांच्या फांद्याप्राणेच आहेत. लोक त्या विस्तवात टाकतात आणि त्या जळून जातात. त्याचप्रमाणे, यरुशलेमच्या लोकांना मी आगीत टाकीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, “मी त्या लोकांना शिक्षा करीन. पण काही लोक त्या अर्धवट जळालेल्या काटक्यांप्रमाणे असतील. त्यांना शिक्षा होईल. पण त्यांचा संपूर्ण नाश होणार नाही. ‘मीच त्यांना शिक्षा केली’ हे तुम्हाला दिसून येईल व मगच तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे. त्या लोकांनी खोट्या देवांसाठी माझा त्याग केला, म्हणून मी त्या देशाचा नाश करीन.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या