Add parallel Print Page Options

16 तुम्ही लोकांनी राजाला नजराणा पाठविला पाहिजे. तुम्ही सेला येथील कोकरू वाळवंटामार्गे सीयोनकन्येच्या डोंगरावर (यरूशलेमला) पाठविले पाहिजे.

मवाबच्या स्त्रिया अर्णोन नदी ओलांडण्याचा प्रयत्न करतील.
    त्या मदतीसाठी सैरभैर धावतील.
    त्यांची स्थिती, घरटे मोडल्यामुळे जमिनीवर पडलेल्या चिमुकल्या पाखरांप्रमाणे होईल.
त्या म्हणतात, “आम्हाला मदत करा,
    आम्ही काय करावे ते सांगा.
जशी सावली दुपारच्या उन्हापासून आपले रक्षण करते,
    तसे शत्रूपासून आमचे रक्षण करा.
आम्ही शत्रूला चुकवून पळत आहोत.
    आम्हाला लपवा.
    आम्हाला शत्रूच्या ताब्यात देऊ नका.
मवाबमधील लोकांना बळजबरीने त्यांची घरे सोडावी लागली.
    म्हणून त्यांना तुमच्या देशात राहू द्या.
    शत्रूंपासून त्यांना लपवा.”

लुटालूट थांबेल.
    शत्रूचा पराभव होईल.
    दुसऱ्यांना त्रास देणारे ह्या भूमीतून जातील.
नंतर नवा राजा गादीवर बसेल.
    तो दाविदाच्या वंशातला असेल.
    तो सत्यप्रिय, प्रेमळ व दयाळू असेल.
तो खरेपणाने न्याय देईल.
    तो योग्य व बरोबर अशाच गोष्टी करील.

आम्ही मवाबवासीयांच्या गर्वाविषयी
    व अहंकाराविषयी ऐकले आहे.
ते दांडगट व बढाईखोर आहेत.
    पण त्यांच्या बढाया निरर्थक आहेत.
त्या गर्वामुळे सर्व देशाला दु:ख भोगावे लागेल.
    सर्व मवाबवासीयांना रडावे लागेल लोक दु:खी होतील.
पूर्वीच्या गोष्टी त्यांना हव्याशा वाटतील.
    कीर हेरेसेथमध्ये तयार झालेले अंजिराचे केक त्यांना हवे असतील.
हेशबोनमधील मळे व सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या म्हणून लोकांना वाईट वाटेल.
    परकीय राजांनी द्राक्षवेली तोडून टाकल्या.
शत्रूचे सैन्य दूर याजेरपर्यत पसरले आहे.
    ते वाळवंटापासून समुद्रापर्यंत पसरले आहे.
द्राक्षांचा नाश झाला म्हणून मी याजेर
    व सब्मे यांच्याबरोबर शोक करीन.
सुगीचा मोसम येणार नाही म्हणून मी हेशबोन
    व एलाले यांच्याबरोबर रडीन.
उन्हाळी फळे पण नसतील
    आणि हर्षोल्लास पण नसेल.
10 कारमेलमध्ये (द्राक्षमळ्यात) आनंदगान होणार नाही.
    सुगीच्या काळातील आनंद मी कोणालाही होऊ देणार नाही.
द्राक्ष मद्य काढण्यासाठी तयार आहेत
    पण ती नासून जातील.
11 म्हणून मला मवाबबद्दल आणि कीर हेरेसबद्दल फार वाईट वाटते
    या शहरांबद्दल मला खरोखरच अतिशय वाईट वाटते.
12 मवाबवासी त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतील,
    पण काय घडले ते त्यांना दिसेल.
ते इतके दुर्बल झालेले असतील
    की प्रार्थना करण्याची शक्ती त्यांच्यात नसेल.

13 मवाबबद्दलच्या ह्या गोष्टी परमेश्वराने बऱ्याच वेळा सांगितल्या. 14 आणि आता परमेश्वर म्हणतो, “तीन वर्षांत सर्व लोक आणि लोक ज्या वस्तूंचा अभिमान बाळगत होते, त्या सर्व वस्तू नाहीशा होतील. तेथे अगदी थोडे लोक उरतील.”