Add parallel Print Page Options

20 द्राक्षारस आणि मद्य यामुळे लोकांचा स्वतःवरचा ताबा जातो. ते खूप जोरात बोलतात आणि फुशारकी मारायला लागतात. ते झिंगलेले असतात आणि मूर्खासारख्या गोष्टी करायला लागतात.

राजाचा राग सिंहगर्जनेसारखा असतो. तुम्ही जर राजाला राग येऊ दिला तर तुम्ही तुमचे प्राणदेखील गमावू शकता.

कुठलाही मूर्ख वादविवादाला सुरुवात करु शकतो. म्हणून जो वादविवादाला नकार देतो त्याचा तुम्ही आदर करु शकता.

आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.

चांगला उपदेश हा खोल विहिरीतून घेतलेल्या पाण्यासारखा असतो. परंतु शहाणा माणूस दुसऱ्याकडून शिकण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

बरेच लोक आपण प्रामाणिक आणि प्रेमळ आहोत असे सांगतात. पण खरोखरच असा माणूस सापडणे कठीण असते.

चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.

जेव्हा राजा बसून लोकांचा न्यायनिवाडा करतो तेव्हा त्याला स्वतःच्या डोळ्यांनी वाईट गोष्टी बघता येतात.

कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.

10 जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.

11 लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.

12 आपल्याला बघायला डोळे आणि ऐकायला कान आहेत आणि ते परमेश्वरानेच आपल्यासाठी केले आहेत.

13 जर तुम्हाला झोपायला आवडत असेल तर तुम्ही गरीब व्हाल. पण तुमच्या वेळेचा काम करुन उपयोग करा आणि तुम्हाला भरपूर खायला मिळेल.

14 एखादा माणूस तुमच्याकडून काही विकत घेतो तेव्हा तो म्हणतो, “हे योग्य नाही, याची किंमत फार आहे.” नंतर तोच माणूस इतरांना जाऊन सांगतो की त्याने फार चांगला व्यवहार केला.

15 सोने आणि हिरे माणसाला श्रीमंत बनवतात. परंतु जर एखाद्याला तो काय बोलतो आहे हे कळत असेल तर त्याची किंमत खूपच जास्त असते.

16 तुम्ही जर दुसऱ्या माणसाच्या कर्जासाठी स्वतःला जामीन ठेवलेत तर तुम्ही तुमचे कपडे सुध्दा घालवून बसाल.

17 तुम्ही जर फसवून कुठली गोष्ट घेतलीत तर ती चांगली आहे असे तुम्हाला कदाचित् वाटेल. पण शेवटी ती कवडीमोलाचीच ठरेल.

18 योजना आखण्या आधी चांगला सल्ला घ्या. तुम्हाला जर युध्द सुरु करायचे असेल तर मार्गदर्शनासाठी चांगल्या लोकांना शोधा.

19 जो माणूस इतरांबद्दल काही गोष्टी सांगतो, त्यांच्यावर विश्वास ठेवणे शक्य नसते. म्हणून जो खूप बोलतो त्याच्याशी मैत्री करु नका.

20 जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द् किंवा वडिलांविरुध्द् बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे.

21 जर तुम्हाला सहज संपत्ती मिळाली असेल तर तिची तुम्हाला किंमत नसते.

22 जर कुणी तुमच्याविरुध्द् काही केले तर त्याला शिक्षा करायचा तुम्हीच प्रयत्न करु नका. परमेश्वरासाठी थांबा. शेवटी तोच तुम्हाला विजयी बनवेल.

23 काही लोक फसवी वजने आणि मापे वापरतात. ते त्याचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करतात. ते परमेश्वराला आवडत नाही. त्यामुळे त्याला आनंद होत नाही.

24 प्रत्येकाच्या बाबतीत जे काय घडते ते परमेश्वर ठरवतो. म्हणून आपल्या आयुष्यात काय घडणार आहे ते माणसाला कसे काय कळेल?

25 देवाला काही वस्तू देण्याचे वचन देण्याआधी विचार करा. नंतर तुम्ही तसे वचन द्यायला नको होते असे तुम्हाला वाटू शकेल.

26 दुष्ट लोक कोणते ते शहाणा राजाच ठरवील. आणि तो राजाच त्या लोकांना शिक्षा करील.

27 मनुष्याचा आत्मा परमेश्वराचा दीप होय. माणसाच्या मनात काय आहे ते परमेश्वराला कळू शकते.

28 राजा खरा प्रामाणिक आणि सत्यवचनी असला, तर तो त्याची सत्ता राखू शकतो. त्याचे खरे प्रेम त्याचे राज्य बळकट ठेवते.

29 आपण तरुण माणसाचे त्याच्या शक्तीबद्दल कौतुक करतो. पण आपण वृध्दाला त्याच्या पांढऱ्या केसांमुळे मान देतो. त्यावरुन तो पूर्ण आयुष्यमान आहे जगाला हे दिसते.

30 आपल्याला शिक्षा झाली तर आपण चुका करणे थांबवू. दुख: माणसाला बदलू शकते.